
पशुपालन आधुनिकरण संगोपन कार्यक्रमाचे आयोजन
नाशिक प्रतिनिधी -डॉ. शाम जाधव
इगतपुरी. टाकेद बू. आज दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी अधरवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. उज्ज्वलसिंग गुलाबसिंग पवार (पशुवैद्यकीय अधिकारी, टाकेद बू.) यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात सिद्धार्थ वाघ यांनी केली तर प्रस्तावना प्रशांत बोराडे यांनी सादर केली.कार्यक्रमात पशुपालन व्यवस्थापन व आधुनिक पद्धती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. योग्य गोठा व्यवस्थापन, स्वच्छता, वायुवीजन, तापमान नियंत्रण तसेच हिरवा चारा, सायलेज व ड्राय फॉडर या चारा व्यवस्थापनाच्या तंत्रांवर मार्गदर्शन झाले. दुधाळ जनावरांचे संगोपन, दुग्धोत्पादन वाढवण्याचे उपाय या विषयांवर मा. विनायक आठवले (मॅनेजर, स्वदेश फाऊंडेशन, इगतपुरी) यांनी उपयुक्त माहिती दिली. त्यांनी गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, साठवण, शीतकरण व बाजारपेठेतील संधींबाबतही मार्गदर्शन केले.डॉ. सचिन वाघमारे (वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, कोपरगाव) यांनी पशु आरोग्य या विषयावर सखोल माहिती दिली. जनावरांच्या सामान्य आजारांची ओळख, लसीकरणाचे महत्त्व, परजीवी नियंत्रण व आपत्कालीन उपचार यांवर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृत्रिम रेतन, उष्णचक्र ओळखणे, वासरांचे संगोपन आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्याबाबत माहिती देऊन पशुपालकांना जागरूक केले.कार्यक्रमात शाश्वत पशुपालन, पर्यावरण संरक्षण, स्वच्छ पाणी, ऊर्जा बचत, शेणखत व गोमूत्राचा जैविक शेतीतील उपयोग यांवरही विशेष भर देण्यात आला. महिला व युवकांचा पशुपालन क्षेत्रातील सहभाग वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. शासनाच्या विविध योजना, लसीकरण मोहीम आणि विमा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी गायींसाठी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला मा. अशोक ढगे (माजी कुलगुरू, राहुरी विद्यापीठ), स्वदेशतर्फे अमोल लांडगे, डॉ. विष्णु वाडे, अनिल चोकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. बायफतर्फे संजय थेटे, प्रशांत बोराडे, सिद्धार्थ वाघ आणि मीना गांगुरडे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. हा कार्यक्रम पशुपालकांसाठी ज्ञानवर्धक व मार्गदर्शक ठरला.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


