

गोखले महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा.
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
श्रीवर्धन – येथिल गोखले एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन येथे वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. १५ ऑक्टोबर हा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून महाविद्यालयात ग्रंथालय विभागामार्फत बुधवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘वाचनाने वैचारिक आणि भावनिक प्रगल्भता कशी वाढते’ या विषयावर डॉ. रमाकांत नवघरे यांचे राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारसाठी सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रंथपाल उपस्थित होते. या वेबिनारचे आयोजन प्राचार्य, डॉ. विवेक खरे आणि आय. क़्यु. ए. सी. समन्वयक डॉ. निलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली ग्रंथपाल, प्रा. सागर कुंभार यांनी केले. तसेच दिनांक १५ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, प्रा. डॉ. विवेक खरे व उपप्राचार्य, प्रा किशोर लहारे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील जास्तीत जास्त पुस्तके वाचावी, वाचनाने तुमचे जीवन अधिक समृद्ध होते’ असे मत प्राचार्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. याशिवाय त्यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीच्या प्रारंभानिमित्त त्यांच्या साहित्य आणि लेखन कौशल्याबद्दल सर्वांना अवगत केले. या ग्रंथ प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तके मांडण्यात आली होती. त्यामध्ये आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या, विश्वकोश, शब्दकोश, अनुवादित आणि स्पर्धा परीक्षांवरील विविध पुस्तके प्रदर्शित करण्यात आली होती. यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल, प्रा. सागर कुंभार यांनी सर्वांना ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल, प्रा. सागर कुंभार आणि ग्रंथालय सहाय्यक सौ. सुरेखा चित्ते यांनी विशेष मेहनत घेतली.


